रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी   

पुणे : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांनी एका वेळी फक्त पाचच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. तसेच, विद्यार्थी वाहतूक करणार्‍या वाहनामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि महिला मदतनीस ठेवणे बंधनकारक आहे. या नियमांचे पालन न करणार्‍या रिक्षाचालक, तसेच व्हॅनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला.
 
पुणे पोलीस आयुक्तालयात शालेय विद्यार्थी वाहतूक जिल्हा सुरक्षितता समितीची बैठक बुधवारी पार पडली. या वेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण, बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम या वेळी उपस्थित होते.
 
विद्यार्थ्यांची सुरक्षेची जबाबदारी ही वाहतूक करणारे रिक्षाचालक, व्हॅनचालक, तसेच शाळेची आहे. व्हॅनमध्ये सीसीटीव्ही कॅमेेरे लावणे, तसेच महिला मदतनीस ठेवणे बंधनकारक आहे. वाहनचालक, मदतनीसांची चारित्र्य पडताळणी करावी. त्यांची वैद्यकीय तपासणीही करावी.रिक्षातून जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांची वाहतूक करावी. नियमांचे पालन न करणारे रिक्षाचालक व व्हॅनचालक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. चालकांनी वाहनांची नियमित तपासणी (फिटनेस टेस्ट) करून घ्यावी, असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

Related Articles